Jalna News : ५० शेतकऱ्यांना करडई बियाण्याचे वाटप file photo
जालना

Jalna News : ५० शेतकऱ्यांना करडई बियाण्याचे वाटप

वितरिका क्रमांक २४च्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा संस्थेचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

Distribution of safflower seeds to 50 farmers

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : दैठणा खुर्द येथे सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि पैठण डावा कालवा अंतर्गत वितरिका क्रमांक २४च्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून ५० शेतकऱ्यांना करडई बियाण्याचे वाटप करण्यात आले. गोदावरी पाणी वापर संस्था व जलसमृद्धी पाणी वापर संस्था यांच्या वतीने रविवारी (दि. १) गणेश पघळ व राजेंद्र परदेशी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना करडई बियाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संपूर्ण हंगामात शेतीसाठी पाणी उपलब्ध राहील, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची पेरणी करून पाण्याची बचत करण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांनी स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले.

करडई पिकाला तुलनेने कमी पाण्याची गरज असल्याने दुष्काळी परिस्थितीत हे पीक शेतकऱ्यांसाठी पर्याय ठरू शकते. केवळ पाण्याची बचत एवढाच या पिकाचा उद्देश नसून, करडईपासून मिळणारे खाद्यतेलही महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी अशा पिकांकडे वळण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी गणेश पघळ यांनी स्वतः पाणी मागणी अर्ज सादर करून इतर शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीने पाणी मागणी नोंदवावी, असे आवाहन केले. सध्याच्या परिस्थितीत पाण्याची बचत पिकांचे नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर यावरच आगामी हंगामाचे नियोजन अवलंबून असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

पाण्याची मागणी संस्थेकडे अर्जाद्वारे नोंदवावी

वितरिका क्रमांक २४ अंतर्गत पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली पाणी मागणी पाणी वापर संस्थेकडे लेखी अर्जाद्वारे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. पाण्याची मागणी वेळेत नोंदवल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी योग्य पद्धतीने मिळवून देणे शक्य होईल, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT