Dhangar Reservation: Second day of hunger strike
जालना, पुढारी वृत्तसेवाः धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजीत स्मारक परिसरात धनगर समाज बांधवांच्यावतीने दिपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वात बुधवार पासुन आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणास मान्यवरांनी भेटी देउन पाठींबा दिला आहे.
जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक स्थळी दीपक बोऱ्हाडे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळाला माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह आ. अर्जुनराव खोतकर, आ. हिकमत उढाण, माजी मंत्री राजेश टोपे, राकॉ महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा लहाने, माजी नगराध्यक्ष सुनिल आर्दड, प्रशांत वाढेकर, माजी आ. अरविंद चव्हाण यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी दैनिक पुढारीशी बोलतांना बोऱ्हाडे म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी पहिल्या कॅबीनेटच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन विसरल्याने त्यांना आठवण करुन देण्यासाठी देवा भाउ क्या हुआ तेरा वादा असे विचारण्याची वेळ समाजावर आली आहे. सत्तर वर्षांपासून धनगर समाजाला एका टायपिंग चुकीमुळे आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 'धनगड' ऐवजी 'धनगर' अशी दुरुस्ती करण्याची मागणी ते करत आता आहेत. या मागणीसाठी न्यायालयीन लढाई सुरू असून, आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
धनगर समाजाच्या एसटी आर-क्षणाच्या मागणीसाठी यापूर्वीही मराठवाड्यात विविध बैठका आणि आंदोलने झाली आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून हे उपोषण सुरू करण्यात आले असून, येत्या दिवसांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. समाजातील तरुण आणि महिलाही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत. राज्य सरकारने या मागणीवर तातडीने विचार करावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.