Manoj Jarange on Azad Maidan Protest
वडीगोद्री: मुंबई हायकोर्टाने आझाद मैदानावर उपोषण करण्यास परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आंदोलन थांबणार नाही आणि उद्याच आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत.
जरांगे पुढे म्हणाले की, आम्ही आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी मागितली होती. तिथे व्यासपीठ उभारणीचे काम सुरू आहे. परवानगी नाकारणे हा फडणवीसांचा खेळ आहे. आमचं आंदोलन कायद्याला धरून आहे, त्यामुळे सरकारला पोटदुखी होत आहे. मराठे नेहमी कायद्याचा मान राखतात.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करतो. सर्व परवानग्या मागितल्या आहेत. न्यायालयाने काय म्हटलं हे आमच्याकडे आलेलं नाही, आमचे वकील न्यायालयात बाजू मांडतील. लोकशाही मार्गाचं आंदोलन कोणीही रोखू शकत नाही. इंग्रजांच्या काळातही असं झालं नाही. आम्हाला न्याय मिळणार, हा माझा विश्वास आहे.”
जरांगे यांनी सरकारवरही निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांना न्यायालयाने का जाब विचारला नाही? आरक्षण देण्याबाबत प्रश्न विचारायला हवा होता. आम्ही संविधान पाळून शांततेत आमरण उपोषण करू. आमचं आंदोलन थांबणार नाही. २९ ऑगस्टला मी आझाद मैदानावर येऊन आंदोलन करणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “आमच्या वकिलांची टीम तातडीने न्यायालयात जाणार आहे. परवानगी नाकारली असली तरी आमच्याकडे पर्याय आहेत. न्यायदेवता अडथळा करणार नाही. सरकारला आमच्या मागण्यांचा कंटाळा आला आहे. पण आम्ही हटणार नाही, कायदेशीर मार्गाने लढत राहणार आहे.