Despite receiving 384 mm of rainfall in Jalna district, small and medium-sized lakes remain dry
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद कागदावर असली तरी प्रत्याक्षात मात्र मोठा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील लघु व मध्यम तलाव तहानलेलेच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ११.१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ३४६.१ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३८४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३७९.२ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदाचा पाऊस गतवर्षीच्या तुलनेतही अधिक आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी भोकरदन तालुक्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक २२.४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. बदनापूरमध्ये २९.१ टक्के, जालना २१.२ टक्के, जाफराबाद ६.९ टक्के, परतूर ५.८ टक्के आणि अंबडमध्ये ५.४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर मंठा व घनसावंगी तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. मंठ्यात २.८ टक्के तर घनसावंगीत ५.५ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ९ ऑगस्ट रोजी सरासरी ०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये मंठा तालुक्यात ०.५, बदनापूरमध्ये ०.२ आणि परतूरमध्ये ०.१ मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांत या दिवशी पावसाची नोंद झाली नाही.
६३.८ टक्के पाऊस
जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिलिमीटर आहे. आतापर्यंत झालेला ३८४.६ मिलिमीटर पाऊस हा वार्षिक सरासरीच्या ६३.८ टक्के आहे. महावेध प्रणालीवरून ही आकडेवारी घेण्यात आली आहे.