Deputy Chief Minister Shinde celebrates Diwali with farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना तालुक्यातील मौजपुरी येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत सोमवारी (दि.९) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी भिलपुरी गावात आंबादास तांगडे या शेतकऱ्यांच्या घरी भेट देउन शिंदे यांनी बाजरीची भाकरी, पिठल व मिरच्याचा ठेचाचा आस्वाद घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सोमवारी जालना जिल्ह्यातील मौजपुरी गावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भिलपुरी गावातील शेतकरी आंबादास तांगडे यांच्या घरी भेट दिली. यावेळी शिंदे यांनी तांगडे कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह लग्नापर्यंतची जबाबदारी घेतली. शिंदे यांचे तांगडे यांच्या घरी आगमन होताच त्यांचे तांगडे कुटुंबीयांकडून औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी तांगडे यांच्या आईसह घरातील कुटुंबीयांची शिंदे यांनी विचारपूस करुन दुष्काळग्रस्त परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना शिंदे म्हणाले कि, राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट आहे. या संकटात शिवसेना पक्षासह राज्य सरकार व केंद्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या ताकदीने पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासन पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा चारा, अन्नधान्याचे नियोजन करणार आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना प्रसंगी अटी व शर्थी दूर करून मदत करण्यात येईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह सामूहिक विवाह सोहळ्यात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
लाडक्या बहिणींना २१०० रूपये देणार
दुष्काळात शेतकऱ्यांना सर्व ती मदत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य व केंद्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तसेच लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्यास सरकार बांधिल असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.