Jalna News : बदनापूर शहरातील अतिक्रमणावर हातोडा file photo
जालना

Jalna News : बदनापूर शहरातील अतिक्रमणावर हातोडा

नगर पंचायत इमारतीची गॅलरी हटविली, रस्त्याने घेतला मोकळा श्वास

पुढारी वृत्तसेवा

Demolition drive against encroachments in Badnapur city

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातून जाणाऱ्या जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रस्ता मोकळा करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईस सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंना ५० फुटांच्या हद्दीतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालविण्यात येत आहे. नगर पंचायत कार्यालय इमारतीची गॅलरी पाडण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून अतिक्रमण हटविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर पुन्हा अतिक्रमणे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे यावेळी करण्यात येणारी कारवाई कितपत कायमस्वरूपी ठरते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना महावितरणचे रस्त्यालगत असलेले विद्युत पोल मात्र जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. रस्ता मोकळा करण्याच्या दृष्टीने अतिक्रमणे हटविली जात असतील, तर रस्त्याच्या हद्दीत येणारे विद्युत पोलही हटविण्यात येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या महामार्गावर नेहमीच वर्दळ असल्याने वारंवार वाहतूक कोडी होत होती. तसेच वाहनचालकांकडून रस्त्यावर वाहनाची पार्किंग करण्यात येत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले होते. मागील दोन दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत असल्याने जालना-छ. संभाजीनगर महामार्गान मोकळा श्वास घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT