Jalna Electricity Problem pudhari photo
जालना

Jalna Electricity Problem : शहराचा वीजपुरवठा विस्कळीत

सर्व्हे नंबर 488 मध्ये 132 केव्ही केंद्राची मागणी

पुढारी वृत्तसेवा

जालना ः जालना शहरातील सर्व्हे नंबर 488 येथील 33 केव्ही उपकेंद्र सध्या ओव्हरलोड झाले असून, यामुळे नागरिकांना वारंवार वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पारेषण महावितरण कंपनीने येथे 132 केव्ही केंद्र उभारून सिरसवाडी येथे नवीन 33 केव्ही उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या जालना शहरातील मोती बाग आणि सर्व्हे नंबर 488 येथील उपकेंद्रांतून वीज पुरवठा केला जातो. मात्र, सर्व्हे नंबर 488 उपकेंद्रात 17 फीडर असून ते ओव्हरलोड झाल्यामुळे वारंवार इनकमर ट्रिपिंग होते आणि संपूर्ण भागाचा वीज पुरवठा खंडित होतो.

सिरसवाडी, देवपिंपळगाव, दरेगाव यांसारख्या परिसरातील फीडर ओव्हरलोड असल्यामुळे ग्रामीण भागातही वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देताना वीज वारंवार खंडित होत असल्याने मोटार सुरू करण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहे.

महावितरणच्या अनेक तारा 50 ते 60 वर्षे जुन्या झाल्या असून त्या वारंवार तुटत आहेत. याशिवाय, शहरासह ग्रामीण भागात ओव्हरलोड झालेले 100 केव्ही आणि 63 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर बदलून नवीन बसवण्याची तातडीने गरज असल्याची मागणी होत आहे.

लक्ष देण्याची गरज

जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व्हे नंबर 488 मध्ये 132 केव्ही केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि पारेषण महावितरणने याचा प्रस्ताव तातडीने सादर करून तो मंजूर करावा, अशी मागणी वीज ग्राहकांतून होत आहे. ऊर्जा मंत्री, पारेषणचे मुख्य अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी अपेक्षा जालनेकर व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT