आन्वा ः भोकरदन तालुक्यासह आन्वा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत मोठ्या आशेने मिरची पिकाची लागवड केली, मात्र सध्या जोरदार वारा वाहत असल्याने विहिरींच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहेत. त्यामुळे मिरची पिकाला जबरदस्त फटका बसत असून मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला लावलेले हे मिरची पीक आता अवघ्या काही दिवसांत तोडणीवर येणार आहे. शेतात हिरवीगार मिरची बहरली असून, बाजारपेठेत माल पाठवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, ऐन तोडणीच्या तोंडावर असतान विहिरींनी तळ गाठल्याने मिरची उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
तसेच मिरचीच्या हंगामात जर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला, तर बाजारापर्यंत माल कसा पोहोचवायचा, याची चिंता सतावू लागली आहे. परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कर्जबाजारी होऊन, तर काहींनी सोन्या-नाण्याची आणि पैशांची मोठी तजवीज करून मिरची लागवडीचा जुगार खेळला आहे.
मिरची पिकाला सुरुवातीपासूनच मोठा खर्च येतो. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, महागडी औषधे, खते, मजुरी असा एकरी लाखांच्या घरात खर्च करून शेतकऱ्यांनी हे पीक डोळ्यात तेल घालून जोपासले आहे. आता कुठे हातात चार पैसे मिळण्याची वेळ आली असतानाच, इंधन टंचाईची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या डोक्यावरआहे. त्यामुळे वर्षभराची मेहनत आणि लावलेली भांडवली पुंजी पाण्यात जाते की काय, अशी भीती आता व्यक्त होत आहे.
सात हजार हेक्टरवर लागवड
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या क्षेत्रात वाढ झाली. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, तालुक्यात जवळपास सात हजार हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात हे मिरचीचे मुख्य आगार मानले जाते. येथील मिरची स्थानिक बाजारपेठेसह परराज्यातही मोठ्या प्रमाणावर पाठवली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या उत्पादनाला जर योग्य वेळी वाहतुकीची व्यवस्था मिळाली नाही.