Parbhani News | खरिपाची कसर रब्बीने भरली; पूर्णा तालुक्यात गहू, हरभरा अन् ज्वारीचा जोमदार 'उतारा'

रब्बीच्या भरघोस उत्पादनाने तूट भरून काढल्याची भावना तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत
Parbhani News
Parbhani News
Published on
Updated on

पूर्णा : मागच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक वाया गेल्याने हतबल झालेल्या पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता रब्बीच्या पिकांनी समाधान आणले आहे. जमिनीत टिकलेला ओलावा आणि पोषक हवामानामुळे यंदा गहू, हरभरा व ज्वारीचे उत्पादन भरघोस मिळत असून, तालुक्यात सध्या काढणी व मळणीची मोठी लगबग सुरू आहे.

ओलावा आणि थंडीचा पिकांना फायदा

यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णतः वाया गेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण मदार रब्बी हंगामावर होती. सुदैवाने, जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर पेरणी केली. तालुक्यात यंदा २७,६१४ हेक्टरवर हरभरा, ८,६४३ हेक्टरवर ज्वारी आणि ६,०३२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. हिवाळ्यातील पोषक वातावरणामुळे पिके जोमदार आली असून सध्या त्यांचा उताराही समाधानकारक मिळत आहे. ज्वारीच्या उत्पादनासोबतच जनावरांच्या चाऱ्यासाठी (कडबा) देखील चांगली तजवीज झाल्याने पशुपालकांना मोठा आधार मिळाला आहे.

उत्पादनाचे गणित (एकरी):

  • गहू: १० ते १२ क्विंटल

  • हरभरा: ६ ते ७ क्विंटल

  • ज्वारी: ५ क्विंटलपर्यंत

मळणीसाठी यंत्रांचा आधार; अवकाळीची धास्ती

मजुरांची टंचाई आणि मध्यंतरी निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे शेतकऱ्यांनी गव्हाची मळणी करण्यासाठी पंजाब येथून आलेल्या मोठ्या हार्वेस्टर यंत्रांना पसंती दिली आहे. एक एकर क्षेत्राची मळणी केवळ अर्ध्या तासात पूर्ण होत असून, त्यासाठी एकरी २ हजार रुपये दर आकारला जात आहे. अवकाळी पावसाचा फटका बसण्यापूर्वी पीक सुरक्षितरीत्या घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात मोठी धावपळ पाहायला मिळत आहे.

बाजारपेठेत गव्हाचे दर घसरले

उत्पादन वाढल्याने बाजारपेठेत गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, गव्हाच्या दरात क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली असून, ३ हजार रुपयांवर असलेला भाव खाली आला आहे. मात्र, ज्वारी आणि हरभऱ्याचे दर अद्याप स्थिर असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीने खरिपाचा घास हिरावला असला, तरी रब्बीच्या भरघोस उत्पादनाने त्याची तूट भरून काढल्याची भावना तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news