परतूर ः परतूर तालुक्यातील दैठणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेला गटशिक्षणाधिकारी डॉ.भरत वानखेडे यांनी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राजकुमार जाधव यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ऋषिकेश कणसे व हर्षवर्धन रेपे या विद्यार्थ्यांना अभ्यास केला नसल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या अंगावर व्रण उमटले आहेत. या घटनेमुळे पालकांमधे तीव्र संताप व्यक्त होत असून, मारहाणीच्या दहशतीमुळे विद्यार्थी घाबरलेले आहेत.
दैठणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजकुमार जाधव नावाचे शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या ऋषिकेश कणसे आणि हर्षवर्धन रेपे या दोन विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या कारणावरून बेदम चोप दिला. ही मारहाण इतकी अमानुष होती की, विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारहाणीचे वळ उमटले असून त्यांची प्रकृती बिघडल्याचे समजते.
केवळ सात-आठ वर्षांच्या या चिमुकल्यांना शिक्षकाने अशा प्रकारे मारहाण केल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शाळेत झालेल्या अमानुष मारहाणीबाबत संतप्त सवाल पालक विचारत आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे.