Crowds Gather for Folk Theater Performance at Balaji Festival in Paradh
पारध, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पारध येथे सुरू असलेल्या बालाजी महोत्सवांतर्गत महादेवाच्या स्वारीनिमित्त आयोजित तुफान विनोदी लोकनाट्याने प्रेक्षकांना हास्याची मेजवानी देतानाच सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य केले.
"बाई तुझ्या पायी अर्थात विहीर गेली चोरीला" या लोकनाट्याचे दिग्दर्शक रवींद्र लोखंडे, प्रा. शरद काकडे, रमेश सुरडकर, प्रा. रुपेश ठाकूर, सुकेशनी पाटील, डॉक्टर रुबी, साधना विटोरे, पांडु लोखंडे, धनंजय देशमुख, प्राध्यापक मगर तसेच कडूबा पांडे यांनी दमदार अभिनय सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
नाटकातून ग्रामीण भागातील शासकीय योजनांमधील गैरप्रकार आणि भ्रष्टाचारावर हलक्याफुलक्या पण प्रभावी शैलीत प्रहार करण्यात आला. कार्यक्रमात भारुडकार प्रा. शरद काकडे यांनी स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर प्रभावी भारुड सादर करून समाजप्रबोधन केले. "मुलाला मुलगी पाहिजे, मुलाला बहीण पाहिजे; पण मुलींना बहिणी नकोत" या त्यांच्या विचारप्रवर्तक वाक्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
या कार्यक्रमासाठी परमेश्वर लोखंडे, गणेश लोखंडे, माजी सरपंच आर. आर. पाटील, बालाजी संस्थानचे अध्यक्ष दिलीप बेराड, सचिव बंकिमचंद्र लोखंडे, सुभाष तबडे, देविदास तेलंग्रे तसेच महर्षि पराशर ऋषि महाराज मंदिर संस्थानचे सचिव समाधान लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पारध येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी नवनाथ जंजाळ, प्रसाद जाणोकार आणि कृष्ण लोखंडे यांनी विशेष मेहनत घेतली. दरव-र्षीप्रमाणे महोत्सवात रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या लोकनाट्याने वातावरण रंगतदार झाले. हे लोकनाट्य सुमारे दीड वाजेपर्यंत चालले. धार्मिक उत्साह, सांस्कृतिक रंगत आणि सामाजिक जाणीव यांचा संगम असलेला हा कार्यक्रम पारध ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरला.
महादेवाची स्वारी
महादेवाच्या स्वारीची तयारी करण्यात आली. पहाटे २:४० वाजता महादेवाची स्वारी निघून संपूर्ण गावात फिरली यावर्षी महादेवाची स्वारी हे महादेव म्हणून अमोल देशमुख तर पार्वती म्हणून रोहन लोखंडे यांनी घेतले होते. यामुळे धार्मिक वातावरणाला अधिकच उंची मिळाली.