Crop damage assessment in Ambad Taluka in final stages
अंबड पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत तालुक्यातील १३८ गावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पंचनामे पूर्ण झाले आहेत. महसूल, कृषी आणि पंचायत समिती या तीन विभागांतील सुमारे सव्वाशे अधिकारी-कर्मचाऱ्यांची पथके बांधाबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करीत आहेत. अशी माहिती तहसीलदार सोमेश मोहिते यांनी दिली.
प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले असून, ५५ तलाठी, ९ मंडळ अधिकारी तसेच पंचायत समिती आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या पाच दिवसांपासून पंचनाम्याचे काम वेगाने सुरू असून, गुरुवारपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
यंदा सोयाबीनची पेरणी सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे ३० टक्क्यांनी वाढली. दरवर्षी सरासरी १० हजार २७७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. यंदा हे क्षेत्र १३ हजार २३१ हेक्टरपर्यंत पोहोचले. मात्र, सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि त्यानंतर पावसाने पूर्णपणे दगा दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
कापसाचे सरासरी ५५ हजार २३५ हेक्टरच्या तुलनेत यंदा ५३ हजार १४१ हेक्टरवर कापसाची पेरणी झाली. तुरीचा सरासरी पेरा १२ हजार ५६७ हेक्टर असून, यंदा १० हजार १४६ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरण्यात आली आहे. सोयाबीनचे क्षेत्र मात्र सरासरी १० हजार २७७ हेक्टरवरून वाढून १३ हजार २३१ हेक्टर झाले आहे.
यंदा ७९ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी
तालुक्यात खरीप हंगामात दरवर्षी सरासरी ८५ हजार ७९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. यंदा उसाच्या क्षेत्रात सुमारे सहा हजार हेक्टरने वाढ झाल्याने इतर खरीप पिकांचे क्षेत्र काही प्रमाणात घटले असून, यंदा एकूण ७९ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे.
भरघोस मदतीची गरज : शासनाने अद्याप शासना कडून मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ मदतीचे स्वरूप आणि रक्कम जाहीर करून अडचणीतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन आधार द्यावा, अशी मागणी बोरी येथील प्रगतिशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन भोरे यांनी केली.गोवर्धन भोरे
पंचनामे नियमाप्रमाणेच होणार : तहसीलदार पंचनाम्याच्या कामात अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. पंचनामे शासनाच्या नियमांनुसारच करण्यात येत असून, आपण स्वतः संपूर्ण प्रक्रियेतील बारकाव्यांकडे लक्ष ठेवून आहोत. पंचनाम्यात कोणताही गैरप्रकार होणार नाही आणि एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, ही प्रशासनाची कठोर भूमिका आहे, अशी माहिती तहसीलदार सोमेश मोहिते यांनी दैनिक