Crackdown on illegal liquor sales; 449 cases registered in four months!
संघपाल वाहूळकर
जालना : जिल्ह्यात अवैध दारूविक्री, वाहतूक व अन्य मद्यविषयक गैरप्रकारांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. १ एप्रिल ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विभागाच्या जालना, अंबड, भोकरदन तसेच भरारी पथकाने केलेल्या कारवाईत एकूण ४४९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४३९ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १२ वाहनांसह एकूण किंमत ५३ लाख ७९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अद्याप दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत दाखल झालेल्या ४४९ गुन्ह्यांपैकी ४३७ प्रकरणांमध्ये दावा करण्यात आला असून १२ प्रकरणे अनक्लेम्ड आहेत. कारवाईदरम्यान विविध प्रकरणांतून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एप्रिल ते २९ जुलै या कालावधीतील सर्व पथकांची एकत्रित आकडेवारी पाहता ४४९ गुन्हे, ४३९ अटक आणि १२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
जप्त वाहनांची एकूण किंमत १८ लाख ९६ हजार १६० रुपये, तर अन्य मुद्देमालाची किंमत ३४ लाख ८३ हजार १५ रुपये आहे. त्यामुळे वाहनांसह एकूण ५३ लाख ७९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोकरदन निरीक्षकांच्या पथकाने १०६ गुन्हे दाखल करून १०५ प्रकरणांमध्ये दावा केला आहे. या कारवाईत १०५ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण ५ लाख ३१ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अंबड निरीक्षकांच्या पथकाने ८० गुन्हे दाखल केले असून ७८ प्रकरणांमध्ये दावा करण्यात आला आहे. या कारवाईत ७८ जणांना अटक करण्यात आली. पाच वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ८ लाख ८५ हजार रुपये आहे. अन्य मुद्देमालाची किंमत ५ लाख ४१ हजार ७२० रुपये, तर एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १४ लाख २६ हजार ७२० रुपये इतकी आहे.
जिल्ह्यात अवैध मद्यविक्री व वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नियमितपणे तपासणी व कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील. -ज्ञानेश्वरी आहेर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग