Cow vigilantes seize pickup truck carrying seven cattle illegally
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरातील केजीएन चौक विशाल कॉर्नर परिसरातून जनावरांनी भरलेला पिकअप वाहन पकडण्यात गौरक्षकांना यश आले. हे वाहन संशयितरीत्या शहराकडे येत असल्याची माहिती मिळताच गौरक्षकांनी पाठलाग करून पिकअप ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. ही कारवाई गुरूवार दि. २७ रोजी करण्यात आली.
दरम्यान, बोलेरो पिकअप (क्र. २८ १०२१) हा गोवंशीय जनावरांची विनापरवाना वाहतूक करत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यावरून गोरक्षकांनी गुरूवार दि. २७रोजी विशाल कॉर्नर परिसरात पिकअप अडवला. पाहणी केली असता, वाहनात ७ जनावरे विनापरवाना वाहतूक करताना आढळली.
जनावरांच्या वाहतुकीबाबत वाहनचालकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गोरक्षकांनी तत्काळ चंदनझिरा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पिकअपसह अवैधरीत्या वाहतूक केली जाणारी जनावरे ताब्यात घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये एकूण सात बैल आढळून आले. या जनावरांची किंमत अंदाजे ३८ हजार तर पिकअप वाहनाची किंमत २ लाख असल्याने एकूण २ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जप्त केलेले सर्व सात बैल जालना शहरातील एका गौशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी पो. का. रवि देशमुख यांच्या फिर्यादीवरून शेख सलमान शेख रहेमतुल्लाह (रा. मुडेगाव, ता. जि. जालना) यांच्याविरोधात चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील जनावरे जुना जालना भागात कत्तलीसाठी जात असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला नेहमी या गाडीमध्ये अवैधृतीय गोवंश जनावरांची वाहतूक करण्यात येत आहे. जुना जालना आणि मंगल बाजार मध्ये कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याचा आरोप गौरक्षकांनी केला. यासंदर्भात त्यांनी चंदनझिरा पोलिसांकडे माहिती देखील दिली.