कापसाचे भाव वाढले; शेतकऱ्यांमध्ये समाधान pudhari photo
जालना

Cotton Price Increase : कापसाचे भाव वाढले; शेतकऱ्यांमध्ये समाधान

स्थानिक बाजारात कापसाचा दर गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढत असून, सध्या तो साडेआठ हजार रुपयांजवळ पोहोचला आहे.

पुढारी वृत्तसेवा

जालना : येथील स्थानिक बाजारात कापसाचा दर गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढत असून, सध्या तो साडेआठ हजार रुपयांजवळ पोहोचला आहे. मंगळवारी स्थानिक बाजारात कापसाची कमाल किंमत आठ हजारांवर दोनशे रुपये नोंदवली गेली.

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मंदीत असलेले कापसाचे दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काही दिवस हा दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे हा दरवाढ कल कृत्रिमरीत्या तयार केला गेल्याचे कापूस ब्रोकर्स बोलत असून तो किती काळ टिकेल, याविषयी ते साशंकता व्यक्त करत आहेत.

मागणीत वाढ, पुरवठ्यातील तुटवडा, सरकारी नियंत्रणातील खरेदी आणि रुई व सरकीच्या दरातील सुधारणा ही कापसाच्या दरवाढीमागे असणारी मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भाव सतत वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कापसाची विक्री केलेली नव्हती, त्यांना या वाढीव दरांचा फायदा होत आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, याआधी सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) खरेदीमुळे बाजारात दरांवर नियंत्रण राहिले होते. मात्र, मागणीत झालेल्या वाढीमुळे खुल्या बाजारात दर वाढीचा कल दिसून येत आहे.

वाढीचे संकेत

या वाढीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. कापसाच्या खरेदी व्यवहारांत सोमवारी कापसाला कमाल आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले. आगामी दिवसांत साडेआठ ते 9 हजारांच्या आसपास किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT