जालना : कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कटली. गरज भागविण्याकरिता अल्पदरात पांढरे सोने विकावे लागत आहे. भाववाढीची प्रतीक्षा संपल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षांपूर्वी नऊ हजार रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव गाठलेल्या कापसाच्या भावात सतत घसरण होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सीसीआयने आठ हजार 85 रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल म्हणून कापूस घरातच साठवून ठेवला होता. परंतु, जानेवारी महिना उजाडला असला तरी बाजारपेठेत खासगी व्यापाऱ्याकडून 6 हजार 800 ते 7500 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी होत आहे. अगोदरच यंदा अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापसाचे पीक हातचे गेले आहे. त्यात कापसाचे भाव कमी झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकरी दरवर्षी नगदी पिक म्हणून कापसाचे उत्पादन घेत असतो. परंतु ऐन कपाशीला कैऱ्या लागण्याच्या काळातच सततधार पावसाने सुरुवात केल्याने कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या शेतात तुंबलेले पाणी मोटारीद्वारे बाहेर काढून कपाशी पीक जगविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत कपाशीचे पीक हातात आणले. परंतु, त्यातही कापूस वेचायलाही मजूर सापडत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिरिक्त भाडे देत बाहेर जिल्ह्यातून मजूर आयात करीत दहा ते पंधरा रुपये किलोप्रमाणे मजुरी देत कापूस घरात आणला आहे.
कापसला यंदा दहा हजार रुपये भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यापर्यंत कापूस सांभाळून ठेवला आहे. परंतु कापसाच्या भावात सतत घसरण होत असल्याने नाविलाजाने शेतकऱ्यांना बेभाव कापूस विक्री करावी लागत आहे. सदर वर्षीप्रमाणे यावर्षी ही शेतकरी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडता आहे.
आर्थिक व्यवहारांना खीळ
शेतकऱ्यांचे सर्वच आर्थिक व्यवहार शेती उत्पादित माल विकल्यानंतर येणाऱ्या पैशावर अवलंबून असतात. यावर्षी कापूस, सोयाबीन, चणा व तूर या पिकांना समाधानकारक भाव नाही. दरवाढीच्या प्रतीक्षेत ही पिके घरी राखून ठेवण्यात आली. त्यामुळेच शेतकऱ्यांकडे पैसे आले नाही. शेतकऱ्यांचे सर्वच व्यवहार खोळंबले आहेत. पैशाकरिता व्यापारी तगादा लावत आहे. बँक, बचत गट आदी ठिकाणांवरून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात वारंवार संदेश येत असल्याने शेतकरीराजा चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे.
यावर्षी अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसचे उत्पन्नात घट झाली आहे. यावर्षी भाव मिळेल अशी अपेक्षा होती. सध्या कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.आनंद वाडेकर, शेतकरी