पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. यामध्ये मक्का व सोयाबीन व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाच्या विश्रांतीनंतर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटला असतांनाच कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवादिल झाले आहेत
पिंपळगाव रेणुकाई परिसरात दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात झाली आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच कापूस वेचणी करावी लागत आहे.
कापूस वेचणीसाठी १३ ते १६ रुपये भाव देऊनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अडचण होत आहे. अनेक ठिकाणी स्थानिक मजूर टॅम्पोद्वारे बाहेरील गावात कापूस वे-चणीसाठी जात असल्याने स्थनिक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच राहिला आहे. इतर पिकांच्या कामाला मजूर प्राधान्य देत आहेत. कापूस वेचणी त्रासदायक काम असल्याने याकडे मजूर दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले जात आहे. एक महिला दिवसभरात किमान ६० ते ८० किलो कापूस वेचणी करते. कापसू वेचणीला १३ ते १६ रुपये भाववाढ देऊनही महिला कापूस वेचणीला येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. एकीकडे मजूर मिळत नाहीत, दुसरीकडे कापसाचे भावही अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चोहोबाजूने कोंडी झाली आहे. मजुरांचे भाव वाढत असताना दुसरीकडे कापूस मात्र ६ ते ७ हजार रुपये क्विंटलने विक्री होताना दिसत आहे. यामुळे कापूस पिकात आमदनी आठ्ठनी अन् खर्चा रुपया अशी अवस्था झाली.
मजुरांची होते पळवापळवी
ज्या गावात मजूर आहेत त्या गावात इतर गावांतील शेतकरी जाऊन कापूस वेचणीसाठी जास्तीचा भाव देऊन मजुरांना सकाळीच माल वाहतूक टॅम्पोद्वारे घेऊन जातात. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस तसाच राहत असल्याने दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होत असल्याचे दिसते.
मी चार एकर कपाशी लागवड केली. परतीच्या पावसाने शेतातील कापसाला कोंब आली होती. त्यानंतर काही प्रमाणात कापूस फुटला. मात्र वेचणीला मजूर मिळत नसल्याने कापुस झाडावर लोंबुन तो जमीनीवर पडुन वाया जात आहे.उद्धव देशमुख, शेतकरी