Coordinate preparations for the Sant Muktai Ringan ceremony: Guardian Minister Munde
जालना, पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याच्या तसेच जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेऊन विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखी सोहळा व रिंगण सोहळा निर्विघ्न, सुरक्षित, शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुहास शिरसाठ, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, हिकमत उढाण हे उपस्थित होते. तर आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे, जिल्हाधिकारी आशिमा मितल, पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) संदीप पवार, संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते.
बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी सर्व विभागांनी योग्य नियोजन करून आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, अखंडित वीज पुरवठा, आरोग्य सुविधा औषधीसाठा, तात्पुरती वैटद्यकीय पथके, मोबाईल व सार्वजनिक स्वच्छतागृहे तसेच मुक्कामस्थली आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पोलिस विभागास कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवणे तसेच आवश्यकतेनुसार वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर अधिशमन, महसूल, सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, महावितरण, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, अन्न व औषध प्रशासन, परिवहन तसेच इतर सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करून वारकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पालखी मार्गाचरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिप्याच्या पाण्याची गुणवत्ता, अक्षपदार्थांची तपासणी, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यावर पालकमंत्र्यांनी विशेष भर दिला.
यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या रिंगण सोहळ्याच्या अनुषंगाने जालना शहर महापालिकेमार्फत स्वच्छता, आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, व्यासपीठ उभारणी तसेच इतर सर्व आवश्यक नागरी सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, पार्किंग व्यवस्था, वाहतूक वळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सक्षम नियोजन करण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे सुचविले.
तयारी वेळेत पूर्ण करा
बैठकीत प्रत्येक विभागाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ सुधारणा करून सर्व तयारी विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व कंत्रणांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित पाहणी करून स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय राखावा तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तत्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. शेवटी जिल्हाधिकारी आशिमा मितल यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनामार्फत योग्य नियोजन करून सर्व कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.