Contraband worth ₹14.10 lakh, including 500 kg of beef, seized
अंबड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील धनगर गल्ली परिसरात गोवंश कत्तलीचा प्रकार उघडकीस आला असून, अंबड पोलिसांनी मोठी कारवाई करत अंदाजे १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ५०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, चारचाकी वाहने, दुचाकी तसेच गोवंशीय जनावरांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक संतोष घोडके हे आपल्या पथकासह धनगर गल्ली परिसरातील घटनास्थळी दाखल झाले. तेथील एका तीन मजली घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले. तसेच काही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या जनावरांच्या चारा-पाण्याचीही व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी आदिनाथ काशिनाथ ढाकणे (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून आरोपी हनीफ दादामिया कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, अंबड) व अन्य इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. म्हस्के हे करीत आहेत. यामुळे गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी नेणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.
अंबड पोलिसांकडून कारवाई
पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ५०० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी विविध हत्यारे, सुरी, चाकू, कुऱ्हाडी, वजनकाटा व इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. याशिवाय गोमांस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी टाटा एस, तवेरा, मारुती सुझुकी स्विफ्ट आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनांसह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसेच काही गोवंशीय जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली असून, यामध्ये कालवड, वासरू आणि रेडकू यांचा समावेश आहे.