Condemnation of the attack on the Chief Justice
जालना, पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून, या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यात आला. त्या संदभात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले, की ५ ऑक्टोबर रोजी वकील राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकत हल्ल्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीने आज तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ही घटना म्हणजे देशाच्या संविधानावरच हल्ला असल्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्हा काँग्रेस समिती या विध्वंसक, अराजक आणि असंवैधानिक वर्तनाचा तीव्र निषेध करते आणि आपल्या माध्यमातून भारत सरकार तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती करते की, या प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोरातिकवोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास अबाधित राहील असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र राख, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष बदर चाउस, माजी सभापती अब्दुल रऊफ परसुवाले, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम शेख, नगरसेवक शकिल शेख, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक, ज्येष्ठ नेते कलिम खान, ज्येष्ठ नेते खलील शेख, यूथ काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य जायभाये, यूथ प्रदेश सचिव सूरज यंगटवार, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख रघुवीर गुडे, कुदरत खान, सय्यद अकीब यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेवर आघात
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली. सर्वोच्च न्यायालयात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. राकेश किशोर याचे हे कृत्य केवळ न्यायालयाचा अवमान नाही, तर भारतीय न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेचा, पावित्रतेचा आणि संवैधानिक अधिकारांवरचा थेट आघात असल्याचे म्हटले आहे.