Concession of ₹73 lakh for electricity consumers with smart meters installed
जालना, पुढारी वृत्तसेवा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळत आहे; यामुळे वीज ग्राहकांना वीज वापरावरही नियंत्रण ठेवता येत आहे. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलत देत आहे. जालना मंडळातील मंडलातील ६१ हजार ४४२ ग्राहकांना ७३ लाख २७हजार ४६४4 रुपये सवलत मिळाली आहे.
सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीज वापरासाठी सवलत लागू केली आहे. घरगुती ग्राहकांना २०२५ च्या जुलै महिन्यापासून सवलत मिळत आहे.
टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली. जुलै २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत ८० पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. यंदा ही सवलत ८५ पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षात ती वाढत जाणार आहे.
२ छत्रपती संभाजीनगर परिमंडलात लाख ७२ हजार ५६९घरगुती ग्राहकांना जुलै-२०२५ ते मे-२०२६ या ११ महिन्यांच्या वीजबिलात ३ कोटी ८१ लाख १७हजार १२८ रुपयांची टीओडी सवलत मिळाली. छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील ७१हजार ६८७ग्राहकांना १ कोटी ५४ लाख २१ हजार २०९ रुपये, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील १ लाख ३९ हजार ४४० ग्राहकांना १ कोटी ५३ लाख ६८ हजार ४५५ रुपये तर जालना मंडलातील ६१ हजार ४४२ ग्राहकांना ७३लाख २७हजार ४६४4 रुपये सवलत मिळाली.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक
वीजवापराची दिवसा सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे तसेच अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. जालना जिल्हयात स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.