पारध: पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पारध येथे बस थांबा नाहीत. सध्या उन्हाळा सुरू आहे. घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा उन्हातान्हात प्रवाशांना बसची वाट पाहत उभा राहवे लागत आहे. त्यामुळे पारध येथे नवीन बस थांबा उभारावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
तालुक्यातील पारध हे गाव विदर्भाला लागून असल्यामुळे बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना इथे जाणारे प्रवासी जास्त आहेत. पण पारधला बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना उन्हातच ताटकळत बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. बस थांबा नसल्यामुळे प्रवाशांना शेजारी असलेल्या हॉटेल, मेडिकल, थंडपेय यांच्या दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे.
यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामध्ये बसच्या फेऱ्यादेखील अनियमित आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. शाळकरी मुले, अपंग-दिव्यांग बांधव, आजारी माणसे, ज्येष्ठ नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षापासून बसथांबे उभारण्याचा विषय प्रलंबित आहे. अद्याप बसथांबे बांधले गेले नाहीत. काही ठिकाणी बसच्या फेऱ्यादेखील नियमित नाहीत. त्यामुळे बस ही प्रवाशांच्या सेवेसाठी की, त्यांना त्रास देण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता सध्या मुलांचे पेपर चालू आहे आणि पारधला तीन कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे पण पेपर सुटल्यानंतर घरी जाताना विद्यार्थ्यांना बस स्टँडला च्या परीसरात उन्हातच बसची वाट पाहत थांबव लागते.
सध्या घरात फॅनखाली बसले तरी अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. एवढी उष्णता वाढली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना रखरखत्या उन्हात पदपथावर उभा राहून बसची वाट पाहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची काळजी घेत, ज्या ठिकाणी बस थांब्याची गरज आहे तेथे थांबा उभारावा.- प्रिया ताम्हाणे (विद्यार्थिनी)