City bus service launched in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या सिटी बससेवेला सोमवार, दि. २१ रोजी प्रारंभ झाला. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सिटी बससेवेचा लोकार्पण सोहळा झाला.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार खोतकर यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सिटी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात आली. जालना-इंदेवाडी, जालना रामनगर आणि जालना-नागेवाडी या मार्गावर बस धावणार आहेत.
विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, व्यापारी आणि रुग्णांसह सर्वसामान्य प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे. भविष्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
लोकार्पणानंतर दानवे पाटील व खोतकर यांनी जालना बसस्थानक ते गांधी चौक (चमन) असा सिटी बसमधून प्रवास केला. यावेळी त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नियमित व सुरक्षित सेवा देण्याच्या सूचना केल्या. जालना -रामनगर, जालना-नागेवाडी, जालना इंदेवाडी अशा तीन सिटी बसेस ची सुरवात करण्यात आली.
सोहळ्यास माजी आमदार अरविंदराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक भास्कर दानवे, युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पंडित दादा भुतेकर, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, महिला आघाडी कालींदा ढगे, नगरसेवक अश्विन आंबेकर, कमलेश खरे, दीपक ठाकूर, अमोल ठाकूर, दुर्गेश कठोटीवाले, योगेश भगत, गणेश सुपारकर, शुभम टेकाळे, सौ विद्या चौधरी, जाफर खान यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.