Chili crop scorched by intense heat; farmers in distress.
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. मे महिन्यात तापमानाचा पारा ४२ तर कधी ४३ अंशांवर पोहोचल्याने शेतात लागवड केलेली मिरचीची रोपे करपू लागली आहेत. मिरचीवर कोकडा रोगाने थैमान घातला आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन करूनही रोपे उष्णतेने माना टाकत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी एप्रिल-मेमध्ये मिरचीची लागवड केली होती. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून रोपे, खते, ठिबक व मल्चिंगचा वापर केला. मात्र लागवडीनंतर लगेचच तीव्र उष्णतेची लाट आल्याने ६० ते ७० टक्के रोपे जळून गेली आहेत. पाणी देऊनही जमिनीतील ओलावा टिकत नसल्याने उरलेली रोपेही सुकत आहेत.
येथील महिला शेतकऱ्यांनी सांगितले, कि दोन एकर मिरची लावली, पण निम्म्याहून अधिक रोपे उन्हाने जळाली. आता पुन्हा लागवड करायची तर पैसा नाही. 'कोकडा रोगामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी पीक विमा योजनेत सुध- ारणा करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. जर तातडीने मदत मिळाली नाही तर अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याची भीती आहे.