जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी गेलेले तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यूमुखी पडले. ही दुर्दैवी घटना ३ जून रोजी सकाळी कोनड बु शिवारातील एका शेततळ्यात उघडकीस आली.
मृतांमध्ये दोन सख्खे भावंडे आणि एक चुलत भाऊ असून, सर्वजण वरूड, ता. जाफ्राबाद येथील रहिवासी आहेत.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे:
यश अनिल जोशी (वय १४)
दिपाली रमण जोशी (वय ९)
रोहन रमण जोशी (वय ७)
मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी सकाळी हे तिघे भावंडे ओलांडा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. संपूर्ण गावात शोध घेण्यात आला, पण काहीच तपास लागला नाही.
तिघे घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी जाफ्राबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, आज ३ जून रोजी सकाळी सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.