'Change your thinking, and your life will surely change.'
जालना, पुढारी वनसेवा आपण जसा विचार करतो, तशीच आपली भावना तयार होते. त्यामुळे विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मोटिवेशनल स्पीकर आणि राजयोग शिक्षिका बी. के. शिवानी दीदी यांनी केले.
सोमवार (दि. १६) रोजीजे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आध्यात्मिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी मंत्री राजेश टोपे आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बहारदार गणपती वंदन सादर केले. यानंतर दिल्ली येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या विधात्री दीदी यांनी संस्थेच्या वैश्विक कार्याचा परिचय करून दिला.
पुढे मार्गदर्शन करताना शिवानी दीदी म्हणाल्या की, राग, भीती, चिंता, ताण आणि नकारात्मकता यापासून मनाला दूर ठेवणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या आणि मोबाईलच्या युगात मन अशांत झाले आहे. अशा वेळी दिवसातील काही मिनिटे स्वतःसाठी काढून 'राजयोग ध्यान' केल्यास मन शांत होते, एकाग्रता वाढते आणि निर्णय क्षमता सुधारते, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
शिवनी दिदी म्हणाल्या की, "विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये आणि स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांशी करू नये. स्वतःवर विश्वास ठेवून रोज थोडा-थोडा पण मनापासून अभ्यास करावा." तसेच पालकांनीही मुलांवर रागावण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. घरातील नातेसंबंध दृढ ठेवण्यासाठी एकमेकांबद्दलचा आदर, समजूतदारपणा आणि माफ करण्याची वृत्ती आवश्यक असल्याचे सांगत, "आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही, पण आपला विचार बदलून आपले आयुष्य नक्कीच बदलू शकतो," असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचा शेवट अत्यंत शांत वातावरणात सामूहिक ध्यानाने झाला.
या सोहळ्याच्या व्यासपीठावर खा. डॉ. कल्याणराव काळे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. नारायणराव कुचे, आ. प्रतापसिंह पाटील, माजी आमदार विलास खरात, माजी आमदार कैलास गोरंट्याल, चंद्रकांत दानवे, अरविंदराव चव्हाण, संतोषराव सांबरे, महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, भास्करराव दानवे, भास्कर आंबेकर, जिल्हा न्यायाधीश भाटिया मॅडम, जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उद्योगपती घनश्याम गोयल, समीर अग्रवाल आणि कैलास लोया यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नागरिक उपस्थित होते.
मानसिक शक्ती मिळेल राजेश टोपे
आपल्या स्वागतपर भाषणात राजेश टोपे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत, शिवानी दीदींच्या या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे मराठवाड्यातील जनतेला कोणत्याही आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिक शक्ती मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.