Chance of rain, citizens warned to be alert
जालना, पुढारी वृत्तसेवाः मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राच्यावतीने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात २९ रोजी ऑरेंज तर ३० ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र हवामान विभागाच्या अलर्टनंतर जिल्ह्यात कोठेही मोठा पाऊस पडला नाही. त्यानंतर आता पुन्हा ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे ओढे, तलाव, विहिरी व नद्या तुडुंब भरल्या आहेत. तर काही भागात समाधानकारक पाऊस पडला आहे. सततच्या पावसामुळे खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.
जिल्ह्यात वीज पडून ३९ जनावरे दगावली आहेत. खरीप पिकांचे पंचनामे सुरू असतानाच कधी ऑरेंज तर कधी यलो अलर्टचा इशारा जारी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पावसाची दहशत कायम आहे.
नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करावे. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ०२४८२-२२३१३२ वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.