Jalna News : महिलेला ट्रोल करणाऱ्या जरांगे यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल file photo
जालना

Jalna News : महिलेला ट्रोल करणाऱ्या जरांगे यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये सोशल मीडिया टीमचे सदस्य 'एआय' चा वापर करून महिलेचे अश्लील फोटो केले व्हायरल; बलात्काराच्या धमक्या.

पुढारी वृत्तसेवा

Case registered against Jarange's supporters for trolling a woman

अंबड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षण आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या एका महिलेची सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बदनामी करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एआयचा गैरवापर करून या महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून ते फेसबुकवर व्हायरल करण्यात आले. तसेच अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

याप्रकरणी जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात भगवानराव जाधव राव, डी ए उंबरे पाटील, बिभीषण लिबाजी पाटील नन्नवरे, बळीराम मोरे, संतोष पाटील राहटीकर या पाच प्रोफाईल धारकांसह इतर ५ ते ६ जणांवर बीएनएस कलम ३५१, ३५६ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अंबड येथील रहिवाशी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्या गेल्या ३ वर्षापासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या. मात्र, कुणबी प्रमाणपत्रावर समाधान न मानता, समाजाच्या पदरात ठोस आरक्षण का पडले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. आम्ही सर्व कामे बाजूला ठेवून मनोज दादा जरांगे यांना साथ दिली, मात्र त्याचे फळ आम्हाला मिळाले नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी २६ सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांसमोर दिली होती. तसेच, माझे प्रमाणपत्र काढून घ्या, नसता मी शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

या सर्व प्रकारामुळे आपली समाजात मोठी बदनामी झाली असून, आपल्या व कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगत फिर्यादी महिलेने स्क्रीनशॉट्सच्या पुराव्यांसह गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष घोडके हे करत आहेत.

समर्थकांकडून बदनामीचा कळस आणि धमक्या

फिर्यादी महिलेच्या या वक्तव्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या काही समर्थकांनी सोशल मीडियावर त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली.

समाजकंटकांनी त्यांचे एआय निर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून फेसबुकवर पोस्ट केले. भगवानराव जाधव राव या फेसबुक अकाऊंटवरून फिर्यादी आणि त्यांच्या सासूबाईंबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत पोस्ट करण्यात आली. त्यांच्या हातात पैशांच्या नोटा दाखवून मराठा समाजाचा फायदा घेऊन तुम्ही बंगला बांधला आणि डिफेन्डर गाडी घेतली असा आरोप करत बदनामी करण्यात आली.

सर्वात धक्कादायक म्हणजे डीए उंबरे पाटील नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून या बाईवर केस करून काय उपयोग नाही, म्हणत अत्यंत अश्लील व विकृत आणि बलात्काराची धमकी देणारी पोस्ट करण्यात आली.

बिभीषण लिंबाजी पाटील नन्नवरे, बळीराम मोरे आणि इन्स्टाग्रामवरील संतोष पाटील राहटीकर या अकाऊंट्सवरूनही अत्यंत अश्लील व घाणेरड्या शिव्या देऊन विनयभंग करणारी वक्तव्ये करण्यात आली.

याशिवाय डीजी रॉक, चेतन उद्धव शेवाळे, त्रिशूल पाटील अपडेट्स, २६ मराठा, प्रदीप पा. शिंदे मित्र परिवार आणि बळीराम बागल अशा अनेक प्रोफाईल्सवरून बदनामीकारक पोस्ट व कमेंट्स करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT