शहागड : पुढारी वृत्तसेवा
अबंड तालुक्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वरील सौंदलगाव पाटीजवळ आज (रविवार) सकाळी साडेसात वाजता कार क्र. ए.पी. 11. ए.टी. 0455 या संभाजीनगरहून हैदराबादकडे जाणाऱ्या कारचा आणि बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला.
कारच्या मध्यभागी बसलेले रमेश कृष्णमूर्ती (वय 42 वर्ष) राहणार हैदराबाद आंध्रप्रदेश हे कंटेनरच्या जोराच्या धडकेमुळे जागीच ठार झाले. तर चालक श्रीराम भास्कर धिता जखमी आहेत. अपघात होताच कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
एन. एच.आय टिमचे मारुती चित्रे, अभिषेक सिरसकर, संजय यरमळ, रुग्णवाहिकेचे डॉ. महेश जाधव, चालक आत्माराम गाडेकर, मदतनीस विठ्ठल गायकवाड यांनी क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. अपघात झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली होती.
या अपघातात जखमीला वडीग्रोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वाघमारे यांनी तपासून मृत घोषित केले. गोंदी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण हावले यांनी कारमधील मृत रमेश कृष्णमूर्ती यांच्या घरी नातेवाईकांना अपघाताची माहिती दिलेली आहे. हैदराबाद येथील नातेवाईक शव घेण्यासाठी निघालेत. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक किरण हावले हे करीत आहेत.