Building airports and highways does not mean the nation is developing: Sharad Ponkshe
जालना, पुढारी वृत्तसेवा : विमानतळे, महामार्ग बांधणे म्हणजे राष्ट्र विकसित होत नाही, असे प्रतिपादन शरद पोंक्षे यांनी केले आहे.
ब्राह्मण सभाभवन येथील कार्यकारिणी सभागृहात वै. वे.शा.स. राघोपंत शास्त्री संगमुळी यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी ख्यातनाम सावरकर अभ्यासक आणि प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे बोलत होते. कल्याणराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथील प्रसिद्ध राघोपंतशास्त्री संगमुळी यांच्या अर्धाकृती मूर्तीचेअनावरण करण्यात आले. व्यासपीठावर लक्ष्मीकांत संगमुळी, हे होते.
प्रास्ताविक विश्वेश्वर संगमुळी यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी भारत हा अतिशय अनादिकाळापासून विकसित झालेले हिंदूराष्ट्र आहे, त्यावेळी भारतात ११ विश्व विद्यालये होती, महामार्ग, विमानतळे बांधून राष्ट्राचा विकास होत नसून त्यासाठी संस्कारित होणे गरजेचे आहे.
भारतावर ११०० वर्षे राज्य केले, त्यातही आपली संस्कृती टिकून राहिली. परंतु मराठेशाही संपून इंग्रजांचे राज्य आले त्यांनी १५० वर्षांत भारताच्या शिक्षणात आमूलाग्र बदल करून भारतीयांना चुकीचा इतिहास शिकवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. संस्कृत मूळ भाषा असून या भाषेला व कुटुंबवत्सल संस्कृतीवर घाला घातला. गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कल्याणराव देशपांडे, डॉ. नीरज देव, लक्ष्मीकांत संगमुळी, भाग्यलक्ष्मी स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्रवाल यांच्यासह डॉ. सुभाष भाले, रमेश देहेडकर, रसना देहेडकर, अॅड. बलवंत नाईक, यशवंत बदनापूरकर, सुनंदा बदनापूरकर, विद्याताई कुलकर्णी, सुनील जोशी, रवी जोशी, मधुकर जोशी, कुलकर्णी, जे.एम. जोशी, सिद्धिविनायक मुळे, श्रीकांत शेलगावकर दाभाडकर, वसंत देहेडकर उपस्थितीत होते.