BJP flag will fly over Partur Municipality MLA Babanrao Lonikar
परतूर, पुढारी वृत्तसेवा : येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागण्याचे आदेश माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांना दिले.
नगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर परतूर शहर भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. ज्यात आमदार लोणीकर यांनी प्रभागनिहाय आढावा घेतला. बैठकीत बोलताना आमदार लोणीकर यांनी स्पष्ट केले की, येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने शहरात केलेली विकास कामे आणि भविष्यातील विकासाच्या संकल्पना घेऊनच पक्ष निवडणुकीला सामोरे जाईल. जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोणीकर म्हणाले की, गेल्यावेळी आपल्याला निसटता पराभव पत्करावा लागला होता, मात्र यावेळी परतूर शहरातील जनतेचा कल निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. त्यांनी परतूर शहरात केलेल्या ७०० कोटी रुपयांच्या विकास कामांची माहिती जनतेला आहे.
यात प्रामुख्याने रेल्वे लाईनवरील ५५ कोटी रुपयांचा उड्डाणपूल, ५६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, सांडपाणी व्यवस्थापन (भूमिगत गटार), १७ कोटी रुपयांचे नाट्यगृह, १९ कोटी रुपयांचे उपजिल्हा न्यायालय, १० कोटी रुपयांचे मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह अशा प्रकारची विकास कामे केली आहेत. यावेळी भगवान मोरे, दया काटे, श्रीरंग जईद, ओम मोर, भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे, शहराध्यक्ष प्रवीण सातोनाकर, संदीप बाहेकर, गणेश पवार, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
उमेदवारांची चाचपणी
शहरातील पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीविषयी आमदार बबनराव लोणीकर यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली आणि निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. आमदार लोणीकर यांनी प्रभागनिहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली आणि योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल, असे सांगितले.