Jalna chilli market pudhari photo
जालना

Jalna chilli market : काट्यावर मिरची; व्यापाऱ्यांकडून दरात कात्री

३०-३२ रुपयांचा भाव सांगून २५-२८ रुपयांत खरेदीचा दबाव; व्यापाऱ्यांची मनमानी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्रसिद्ध मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मिरचीला आधी ३० ते ३२ रुपये किलोचा भाव सांगितला जातो; मात्र माल काट्यावर गेल्यानंतर त्यातील काही पोती खराब असल्याचे कारण पुढे करून दर थेट २५ ते २८ रुपयांवर आणला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दहा पोती मिरची घेऊन बाजारात आल्यानंतर व्यापारी माल पाहून भाव निश्चित करतात. मात्र काट्यावर माल मोजण्याची वेळ आली की, ‘चार पोती खराब आहेत’, ‘मिरची पिवळी पडली आहे’, ‘माल बारीक आहे’, ‘हा माल आम्हाला चालत नाही’, अशी विविध कारणे सांगून मालाचा दर कमी केला जातो. संबंधित माल घ्यायचा असल्यास कमी दराने देण्याचा दबाव आणला जातो; अन्यथा माल घेण्यास नकार दिला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

यंदा मिरची पिकावर विविध कीड, रोग व बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना वारंवार कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. औषधांचा वाढता खर्च, मजुरी, पाणी आणि इतर उत्पादन खर्चामुळे मिरचीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच बाजारभावात झालेली घसरण आणि मालाच्या वजन-काट्याच्या वेळी दर कमी करण्याच्या तक्रारी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

भावात मोठी घसरण

पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील सुमारे ७० ते ८० किलोमीटर अंतरावरून शेतकरी मिरची विक्रीसाठी या बाजारात येतात. काही दिवसांपूर्वी मिरचीला ६० ते ७० रुपये किलोपर्यंत भाव मिळत होता. मात्र मागील १५ ते २० दिवसांत दरात मोठी घसरण होऊन सध्या २५ ते ३० रुपये किलोपर्यंत भाव आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पोती खराब असल्याचे कारण- मिरचीचा माल बाजारात घेऊन गेल्यानंतर सुरुवातीला ३० ते ३२ रुपये किलोचा भाव सांगितला जातो. मात्र काट्यावर माल गेल्यानंतर काही पोती खराब असल्याचे कारण सांगून दर कमी केला जातो. शेतकऱ्याने माल द्यायचा नसेल तर तोही परत घेऊन जाण्याची वेळ येते. आधीच मिरची पिकासाठी औषध फवारणी, मजुरी आणि उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यात बाजारभाव २५ ते ३० रुपयांवर आल्याने शेतकरी अडचणीत आहे. या प्रकाराची चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य भाव आणि पारदर्शक व्यवहार मिळवून द्यावा. कारवाई करावी.
सागर देशमुख, शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT