भोकरदन : सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून सोनाराकडून १ लाख ८० हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी मस्तानखाँ मसीदखाँ पठाण (रा. कठोरा बाजार) आणि शेख कदीर शेख हमीद (रा. दानापूर) या दोघांना अटक करण्यात आली.
१९ सप्टेंबर रोजी दानापूर येथे संजय कालीपद महीती (वय ४६, व्यवसाय सोनार, रा. जळगाव) यांच्याकडून धक्काबुक्की करून १ लाख ८० हजार रुपये हिसकावण्यात आले होते. याप्रकरणी भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल झाला. चौकशीत मस्तानखाँकडून ६० हजार, तर शेख कदीरकडून १ लाख २० हजार रुपये, अशी संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वीनीसिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, प्रभारी स. पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कारवाईत प्रकाश शेळके, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, योगेश गवळी, लक्ष्मण रानगाते व साजेद शेख सहभागी होते.