Bhokardan farmer protest tandav andolan
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा भोकरदन येथे गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू अस लेले आमरण उपोषण फुलंब्रीचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व भोकरदनचे गटविकास अधिकारी एस. एस. वेणीकर यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सोडण्यात आले. यावेळी भोकरदनचे तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान उपोषण सोडण्यापूर्वी मंगेश साबळे यांनी पो-तराजाच्या वेशात रस्त्यावरून व तहसील कार्यालयात तांडव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. भोकरदन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे व विकास जाधव यांचे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू होते.
भोकरदन पंचायत समिती कार्यालयांतर्गत वैयक्तिक लाभाच्या झालेल्या योजनांमध्ये विहिरींच्या कामाचे स्थगित करण्यात आलेले मस्टर सुरू करून त्यांना तत्काळ पेमेंट सुरू करण्यासह इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी त्यांना मूळ स्थानी पाठवण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आलेली होती.
शुक्रवार, २६ रोजी फुलंब्री येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे हे सकाळी भोकरदन येथे आल्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी हातामध्ये डफ घेऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या व त्यांनी केलेले कारवाई याची माहिती घेतली. उपोषणकत्यांनी केलेल्या मागण्या तत्काळ सोडवण्यासाठी चर्चा केली.
मंगेश साबळे यांच्या चर्चेला अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर गटविकास अधिकारी व तहसीलदार भोकरदन यांनी उपोषण स्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी उपोषण सोडले. यावेळी सर्व सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पोतराजाने वेधले लक्ष
सामाजिक कार्यकर्त मंगेश साबळे यांनी तहसीलमध्ये पोतराजाच्या वेशभूषेत जाऊन आंदोलन केले. डफ घेऊन कार्यकर्त्यांसह तहसीलदारांची भेट घेतली. उपोषणकर्त्याच्या मागण्यांबात चर्चा केली. केलेल्या कारवाईची माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी भोकरदन पंचायत समिती कार्यालयात जाऊनही गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.