Banana plantation : पारंपरिक पिकांच्या तुलनेत केळी फायदेशीर file photo
जालना

Banana plantation : पारंपरिक पिकांच्या तुलनेत केळी फायदेशीर

एक एकरात केळीची बाग फुलवली

पुढारी वृत्तसेवा

Bananas are more profitable than traditional crops

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : मेहनत, जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर शेतीत यश मिळवता येते, हे वाहेगाव येथील शेतकरी सचिन गायके व कृष्णा गायके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या एक एकर क्षेत्रात त्यांनी उभारलेली केळीची बाग सध्या भरघोस उत्पादन देत असून बाजारातूनही त्यांच्या मालाला चांगली मागणी मिळत आहे. त्यामुळे गायके बंधूंच्या मेहनतीचे चीज झाले असून परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

अल्प पर्जन्यमान, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता आणि हवामानातील सततचे बदल अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. सुरुवातीपासूनच दर्जेदार वाणांची निवड, ठिबक सिंचनाचा वापर, वेळेवर खत व्यवस्थापन तसेच रोग व किडींचे नियंत्रण यावर भर दिल्याने बागेची वाढ चांगली झाली. परिणामी केळीचे दर्जेदार आणि वजनदार घड तयार झाले आहेत.

एक एकर क्षेत्रात लावलेल्या १ हजार ६३० केळीच्या झाडांपैकी पहिल्या टप्प्यात ४५ झाडांची तोड करण्यात आली. या झाडांमधून सुमारे १ हजार ६० किलो उत्पादन मिळाले आहे. उत्पादनाची गुणवत्ता उत्तम असल्याने व्यापाऱ्यांकडून मालाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या बाजारात केळीला प्रतिकिलो २१ ते २२ रुपये दर मिळत असून एका कॅरेटमध्ये सरासरी २० किलो केळी भरली जात आहेत. पहिल्याच टप्प्यात मिळालेल्या उत्पादनामुळे गायके बंधूंचा आत्मविश्वास वाढला आहे. सध्याचा बाजारभाव कायम राहिल्यास ६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल.

प्रेरणादायी

वाहेगावसह परिसरातील अनेक शेतकरी केळी लागवडीकडे वळण्यास प्रेरित होत आहेत. सध्या बागेतील उर्वरित केळीची तोड सुरू असून पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर माल बाजारात दाखल होणार आहे. गायके बंधूंचे हे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT