Badnapur: Free the road from the stranglehold of encroachments—angry residents demand action
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला दुकानदारांचे साहित्य, हातगाड्या, फलक, बांधकाम साहित्य, फळ विक्रेते, प्रवाशी वाहनं आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
शहरातील दोन प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असताना नगरपंचायत प्रशासन नेमके कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थितत केला जात आहे. दरम्यान, मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या उपस्थितीत जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती.
त्यावेळी वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण वाढत गेले. रस्ते मोकळे करण्यासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई का होत नाही? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जालना आणि अंतर्गत रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.
अतिक्रमणावर कायमस्वरुपी तोडगा काढा
जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. फळ विक्रेते, रिक्षा, कालीपीली चालक आदींसह इतर व्यावसायिक यांनी देखील हा मार्ग आखूड केला आहे. या अतिक्रमणावर हातोडा कधी चालवणार? असा सवाल उपस्थिात करुन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी बदनापूरकरांकडून करण्यात येत आहे.