पराडा येथे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ५ आरोपींना १० वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली. File Photo
जालना

पराडा येथे जिवे मारण्याचा प्रयत्न; ५ आरोपींना १० वर्षांचा कारावास, १० हजारांचा दंड

पुढारी वृत्तसेवा

शहागड, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील पराडा येथे भानुदास पाटोळे तसेच जखमी असलेले शिवनाथ पाटोळे हे घरासमोर बसले असताना त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ५ आरोपींना १० वर्ष कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अंबड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी. गायधनी यांनी आज (दि.१९) ही शिक्षा ठोठावली.

शिक्षा व दंड ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे रामदास सखाराम ज-हाड, ज्ञानदेव सखाराम ज-हाड, विनोद ज्ञानदेव ज-हाड, कैलास रामदास ज-हाड, राजेंद्र बाळासाहेब ज-हाड अशी आहेत.

अंबड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी भानुदास नारायणराव पाटोळे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधीत तपासी अंमलदार यांनी आरोपी रामदास सखाराम ज-हाड आणि इतर ५ विरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी भानुदास नारायण पाटोळे, जखमी शिवनाथ नारायण पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मपाल म्हस्के आणि डॉ. आनंद डंक, तपासी अधिकारी एन.जी. दाभेराव आणि डी.एस. पाटील यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात एकूण सहा आरोपी होते. त्यापैकी एक आरोपी सोपान सखाराम ज-हाड हे मृत झाले आहेत. उर्वरीत ५ आरोपींना न्यायालयाने १० वर्ष कारावास आणि दहा हजार रूपये दंड ठोठावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT