विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.  Pudhari News Network
जालना

विधानसभा निवडणुकीची तयारी: मनोज जरांगेंना भेटण्यासाठी इच्छुकांची गर्दी

Manoj Jarange | अंतरवाली सराटीत १६ ऑगस्टपासून मुलाखती घेणार

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा आटोपून अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. आज (दि.१४) विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काही उमेदवारांनी जरांगे यांची भेट घेतली. परंतु, प्रत्यक्ष मुलाखती १६ ऑगस्टपासून घेणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील बडे नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई मीनल खातगावकर यांच्यासह नांदेड, बीड, नाशिक जिल्ह्यातील काही इच्छुकांनी जरांगे यांची भेट घेत निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. (Manoj Jarange)

फडणवीसांना  रॅली काढून  सत्ता मिळणार नाही 

यावेळी जरांगे म्हणाले की, आता सरकार फक्त कारणे सांगत आहे. काल सरकारला दिलेल्या मुदतीचे दोन महिने पूर्ण झाले आहेत. सरकारला आरक्षण न देता फक्त आशेवर ठेवायचे आहे. आता आम्हाला आरक्षणाची आशा सोडावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांनी आता रॅली न काढता मराठा समाजासाठी उपोषण करावे. आता रॅली काढून त्यांना सत्ता मिळणार नाही. एकनाथ शिंदे आरक्षण देतील. मात्र, त्यांना फडणवीस देऊ देत नाही, असा आरोप जरांगे यांनी यावेळी केला. (Manoj Jarange)

 लाडकी बहीण योजना म्हणजे सावकारी खेळ

लाडकी बहीण योजना म्हणजे मतदान विकत घेण्यासाठी खेळलेली खेळी आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे. या योजनेवर आता शंका येऊ लागली आहे. कारण मतदान केले तर बरं, अन्यथा पैसे परत घेणार असे कुणीतरी बोललेले आहे. हा मतदान विकत घेतल्यासारखा प्रकार आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे.

अन्यथा तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही

२९ ऑगस्टपर्यंत आमचा निर्णय होईपर्यत आरक्षणाबाबत निर्णय घ्या. अन्यथा तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर रेलत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक लावा, असे सांगणारे शरद पवार बैठकीला आले नाहीत. मराठ्यांचे आरक्षण कुणी घालवले, हे सगळ्यांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.

संभाजीनगर येथे धनगर आरक्षणासाठी उपोषण होणार आहे. आम्हीही त्यांच्या पाठीशी आहेत. मी सुद्धा एक दोन दिवस त्यांच्या उपोषणात बसणार आहे.
- मनोज जरांगे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT