Ashima Mittal takes charge as Jalna District Collector
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्हाधिकारी पदाचा पदभार शुक्रवार (१) रोजी आशिमा मित्तल यांनी स्वीकारला. यापूर्वी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून काम करत असताना श्रीमती मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी आयआयटी मुंबई येथून बी.टेक. सिव्हिल इंजिनियरिंग केले असून यामध्ये त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. मानववंशशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे.
श्रीमती मित्तल यांनी २०१७ ची भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्या देशात १२ व्या स्थानी होत्या. २०१८ साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र राज्यात रुजू झाल्या आहेत. यापूर्वी त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयटीडीपीच्या प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे.
तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहिले आहे. श्रीमती मित्तल यांनी शालेय दिवसात राष्ट्रीय प्रतिभा शोध चाचणी, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या सारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केले आहे. श्रीमती मित्तल यांचा प्रदीर्घ अनुभव जालना जिल्ह्याच्या विकासासाठी उपयोगी ठरणार आहे.