भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वृध्द कलावंतांची शासन दरबारी उपेक्षा केली जात असून विविध क्षेत्रांतील कलावंतांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना निवेदन सादर करत वृध्द कलावंतांच्या मागण्या मांडल्या.
या निवेदनात म्हटले आहे की, वृध्द कलावंत, साहित्यिक कलावंत मानधन योजनेंतर्गत भोकरदनसह जाफराबाद तालुक्यातील अनेक कलावंत मानधनापासून वंचित आहेत. तसेच या वृध्द कलावंताच्या फायली शासन दरबारी प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे प्रलंबित असलेल्यांपैकी नरसिंहराव चिकटे, भगवान सावळे या कलावंताचा मृत्यू झाला तरी त्यांची मानधनाची फाईल मंजूर झालेली नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून कलावंतांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंचफुलाबाई सरोदे, कृष्णा बारोटे, कल्याण ठोंबरे, शाहीर उषाबाईकावले, श्रीमंत ढवळे, संगीता उघडे, रघुनाथ गोरे स्वाक्षऱ्या आहेत.
सन २०२१ पासून वृध्द कलावंतांच्या फायली शासन स्तरावर प्रलंबित आहेत. या मानधनामुळे कलावंतांना मोठा आर्थिक लाभ मिळणार असून त्यातून कलावंतांची उपेक्षा दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने कलावंतांचा प्रश्न मार्गी लावावा ही मागणी केली. या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले आहे.सुरेखाताई पगारे, सामाजिक कार्यकर्त्या, भोकरदन.