परतूर : जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (जालना ते नांदेड) च्या कामाच्या नावाखाली गौण खनिजाची प्रचंड लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार परतूर तालुक्यातील वाटूर येथे उघडकीस आला आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड (अलेि खपषीरींशलह र्झीींं ङींव) या कंत्राटदार कंपनीने प्रशासनाने दिलेल्या मंजुरीपेक्षा तब्बल 8,447 ब्रास मुरुमाचे जास्तीचे (अवैध) उत्खनन केल्याचा ठपका परतूरचे तहसीलदार डी. एन. जाधव यांनी आपल्या अहवालात ठेवला आहे.
याप्रकरणी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील दंडात्मक कारवाईसाठी अहवाल सादर केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, वाटूर (ता. परतूर) येथील गट क्रमांक 29 मधील जमीन मालक श्रीमती शोभा इंदर वायाळ आणि अरुण शामराव सावंत यांच्या शेतातून मुरुम उपसा करण्यासाठी कंत्राटदार कंपनी ॲपको इन्फ्राटेकला जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात एकूण 14,000 ब्रास मुरुमाचा अल्पमुदतीचा परवाना देण्यात आला होता.
परंतु, कंपनीने या परवान्याचा गैरफायदा घेत निर्धारित क्षेत्राबाहेर जाऊन अवाढव्य उत्खनन सुरू केले. या तक्रारीनंतर भूमी अभिलेख विभाग आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या (मंठा) वतीने ईटीएस (एढड) तंत्रज्ञानाद्वारे अत्याधुनिक मोजणी करण्यात आली. या मोजणीचा अहवाल समोर येताच शासकीय अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले.
दरम्यान, यापूर्वी देखील मंजुरीच्या अधिक उत्खनन केल्याचे प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. आयसीटी कॉलेजला देखील लाखो रुपयांचा दंड तहसीलने ठोठावला होता.
यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश!
परवान्यापेक्षा हजारो ब्रास मुरुमाची शासकीय चोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तहसीलदार डी. एन. जाधव यांनी हा मोजणी पंचनामा आणि अहवाल पुढील कडक कारवाईसाठी जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान, तहसीलदारांनी वाटूरचे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना (तलाठी) कडक शब्दांत ताकीद दिली आहे. यापुढे संबंधित परिसरात किंवा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे विनापरवाना व अवैध उत्खनन किंवा वाहतूक होता कामा नये.
मोजणीअंती उघड झालेला काळाबाजार
मंजूर मुरूम (ब्रास) - प्रत्यक्षात उत्खनन -जास्तीचे उत्खनन
5,000 -10,219.00 - 5,219 ब्रास
9,000 -12,228.00 - 3,228 ब्रास
एकूण 14,000 -22,447 - 8,447