आन्वा :तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला चांगला वेग आला असून आतापर्यंत सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा उशिरा पावसाचे आगमन झाले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मका, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे.
पेरणी पूर्ण झालेल्या क्षेत्रात आता पिकांची उगवण सुरू झाली असून शेतकऱ्यांचे लक्ष पिकांच्या वाढीकडे लागले आहे. काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करण्याचे, तण नियंत्रण तसेच कीड-रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एक लाख हेक्टरवरील पेरणी पूर्ण झाल्याने तालुक्यात खरीप हंगामाला आता चांगलीच गती मिळाली आहे.
भोकरदन तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झाली असून कृषी विभागाने एक लाख पाच हजार पाचशे एकवीस बहात्तर हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले होते.
खरिपाची कसर रब्बी हंगामात भरून निघाली होती; मात्र उत्पादित झालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही. शेतीमाल कवडीमोल दराने विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. यात नगदी पीक समजल्या जाणाऱ्या ३० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे.
यंदा सोयाबीन पिकाची सर्वाधिक लागवड करण्यात आली असून त्याखालोखाल पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची २८ हजार हेक्टर क्षेत्रावर तर मका २४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे.
भोकरदन तालुक्यात १ लाख ५५२१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील लागवड करण्यात आली असून सर्वाधिक सोयाबीन ३०५७५, कापूस २८८८०, मका २४१३०, तूर २७१६, मूग १४०५, उडीद १२०६, भुईमूग ६००, बाजरी ९७, ज्वारी ३४, तीळ ४६ इतर ३६६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहेत.