देऊळगाव राजा ः दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत अंढेरा पोलिसांनी मंगरूळ परिसरात धडक कारवाई करून अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला रंगेहाथ पकडले. या कारवाईत तब्बल 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात या कारवाईची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर राजू काकडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 जून रोजी सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगरूळ येथे सापळा रचून कारवाई केली. पंचासमक्ष करण्यात आलेल्या छाप्यात आरोपी आपल्या मोटारसायकलवरून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
या कारवाईत सखू संत्रा कंपनीच्या 90 मिली क्षमतेच्या 440 देशी दारूच्या बाटल्या, किंमत 17 हजार 600 रुपये, होंडा शाईन मोटारसायकल किंमत अंदाजे 50 हजार रुपये आणि विवो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 5 हजार रुपये असा एकूण 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांनी उघडलेली ही मोहीम परिसरातील दारू तस्करांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. ग्रामीण भागात अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून यामुळे बेकायदा धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गणेश देढे, पोलिस कॉन्स्टेबल विजय भगवान वायाळ, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र गिते व अंढेरा पोलिस पथकाने केली. पुढील तपास सहायक फौजदार गणेश देढे करीत आहेत.