समृद्धी महामार्गावर अमोनिया नायट्रेटची गळती; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल File Photo
जालना

समृद्धी महामार्गावर अमोनिया नायट्रेटची गळती; टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

चालकाने टँकर न थांबवता प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल.

पुढारी वृत्तसेवा

Ammonium Nitrate Leak on Samruddhi Expressway; Case Registered Against Tanker Driver

जालना, पुढारी वृत्तसेवा समृद्धी महामार्गावरून अमोनिया नायट्रेटची वाहतूक करणाऱ्या एका टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याचे माहित असतानाही चालकाने टँकर न थांबवता प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात मंगळवार, दि. ७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० ते ५ वाजेच्या दरम्यान मुंबईकडून नागपूरकडे जाणारा अमोनिया नायट्रेटचा टँकर (क्रमांक जीजे १२, बीवाय ८४००) गुंडेवाडी फाट्यावरून जात होता. यावेळी टँकरमधून गळती होत असल्याचे कंत्राटदार मच्छिंद्र नवकार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने समृद्धी महामार्गाचे उपअभियंता अतुल अरुण कोटेचा यांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच कोटेचा यांनी कंत्राटदार चेतन शिंदे यांच्यासह घटनास्थळ गाठले. जालना साखळी क्रमांक ३६० (आए-चएस) वर त्यांनी टैंकर थांबवला. यावेळी टँकरमधून रासायनिक द्रवाची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले. उपअभियंत्यांनी टँकर चालक सुनील प्रकाश तिवारी (रा. जुरा, ता. मेहेर, जि. सतना, मध्यप्रदेश) याने कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता किंवा पोलिसांना माहिती न देता त्याने टँकर चालवणे सुरूच ठेवले होते.

या वायू गळतीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल उपअभियंता अतुल कोटेचा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सुनील तिवारी याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. आपत्कालीन यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार विलास आटोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT