Ambad Shri Matsyodari Devi Navratri Festival
अंबड पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवात येथील मत्स्योदरी देवी मंदीराव्या पायऱ्यावर दरवर्षी घटी बसणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे या संख्येत घट झाली आहे. दरवर्षी साधारण दीड हजार भाविक घटी बसत असल्याचे पहावयास मिळते. यंदा यात घट होउन ८०० भाविकांनी घट बसण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये सुमारे १५० पुरुष भाविक असून, उर्वरित महिला आहेत.
अंबड येथील श्री मत्स्योदरी देवी यात्रेला पौराणिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण नऊ दिवस मंदिरातच मुक्काम करून देवीची आराधना करण्याची परंपरा येथे जपली जाते. या संकल्पाला 'घटी बसणे' असे म्हणतात. घटी बसलेल्या भाविकांसाठी देवस्थान संस्थानच्या वतीने मंदिरालगतच्या दोन भव्य सभागृहांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये बिछायत, चहापान, पिण्याचे पाणी, वैद्यकीय पथक, स्वच्छतागृहे आणि स्नानगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, या सभागृहांमध्ये किर्तन, प्रवचन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. घटी बसलेल्या भाविकांसाठी दररोज सकाळी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे. योगेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कटारे यांच्या पुढाकारातून गेल्या २६ वर्षांपासून हा सेवाभावी उपक्रम राबविला जात आहे. श्री मत्स्योदरी देवी मंदिराच्या पायऱ्यावर घटस्थापनेपासून नवमीच्या होमपूजेपर्यंत सलग नऊ दिवस घटी बसण्याची परंपरा आहे. अनेक भाविक संकल्पानुसार घटी बसतात. यामध्ये महिलांची संख्या मोठी असते.
दरवर्षी सुमारे दीड हजार भाविक मंदिराचा मुख्य चौक, पायऱ्या आणि सभागृह अशा विविध ठिकाणी थांबून धार्मिक उपक्रमांत सहभागी होतात. या भाविकांना दररोज सकाळी पौष्टिक आणि रुचकर फराळ मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. १९९९ मध्ये काकासाहेब कटारे यांच्या आजी घटी बसल्या होत्या. त्यांना फराळ देण्यासाठी ते मंदिरात गेल्यानंतर त्यांनी घटी बसलेल्या भाविकांना फराळ देणे सुरु केले.