अंबडः अंबड -घनसावंगी रोडवरील पांगरखेडा शिवारात धारदार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी  (छायाः राजेंद्र कळकटे)
जालना

Jalna Crime : अंबडमधील खुनाचा अवघ्या सहा तासांत केला उलगडा

छत्रपती संभाजीनगरातून दोनजण ताब्यात; अंबड पोलिस, एलसीबीची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

अंबड : अंबड -घनसावंगी रोडवरील पांगरखेडा शिवारात धारदार शस्त्राने एका तरुणाचा खून करून फरार झालेल्या दोन संशयित आरोपींना अंबड पोलीस आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या सहा तासांत छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल टॉवर लोकेशन, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार(२३) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंबड ते घनसावंगी रोडवरील पांगरखेडा शिवारात स्व. एकनाथराव गमाजी तायडे प्रवेशद्वारासमोर एका व्यक्तीचा खून झाल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित व्यक्तीच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याचे आढळून आले.

मृत व्यक्तीची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर सुरुवातीला मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख पटवली. मुस्तकिम गफ्फार शेख (वय २१, रा. शिशटेकडी, जुना जालना, ता. जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले होते.. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणाचा तपास करताना शाहेद सलीम बेग (वय २०) आणि भारत शहादेव वैद्य (वय २०, दोघे रा. अंबड, जि. जालना) या मित्रांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुनानंतर दोघेही छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच अंबड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तातडीने छत्रपती संभाजीनगर गाठले. तेथे सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.

खुनाच्या कारणांचा शोध पोलीस करत आहेत. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला की अन्य कोणत्या वादातून खून झाला, याचा शोध घेतला जात आहे. मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाचा सहभाग

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोडके . सपोनि अमित म्हस्के, महिला पोलिस अलका केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे जमादार राठोड, जमादार खार्डे, धांडगे, पोलिस कर्मचारी गायकवाड, जाधवर यांनी केली यांच्यासह अंबड पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT