सुखापुरी : पावसाने पाठ फिरवली, पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आणि त्यातच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जात आहे. अंबड तालुक्यातील रुई परिसरात दुष्काळाची ही दाहकता पुन्हा एकदा समोर आली असून, मोसंबी बागेतून उत्पन्न मिळण्याऐवजी खर्चाचा बोजा वाढत असल्याने शेतकरी रमेश काळबांडे यांनी शेतातील तब्बल ३०० मोसंबीची फळझाडे जेसीबीच्या साहाय्याने उपटून फेकून दिली.
शेतकरी काळबांडे यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात मोसंबीची बाग उभी केली होती. झाडांची निगा राखण्यासाठी लागवड, खत, औषध फवारणी, मजुरी आणि पाण्यासाठी मोठा खर्च केला. मात्र, पावसाची अनिश्चितता, सिंचनाच्या पाण्याची टंचाई आणि मोसंबीला मिळणारा कमी बाजारभाव यामुळे या बागेतून अपेक्षित आर्थिक परतावा मिळणे कठीण झाले.
उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने अखेर काळबांडे यांनी नाईलाजाने फळांनी बहरण्याची अपेक्षा असलेली ३०० झाडेच जेसीबीने मुळासकट उपटून टाकली. हिरवीगार बाग उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय शेतकऱ्याच्या मनावर किती मोठा आघात करणारा असेल, याची कल्पनाही करवत नाही.
रुई परिसरातील ही घटना केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून, दुष्काळ, वाढता शेतीखर्च आणि बाजारभावाच्या कचाट्यात सापडलेल्या फळबागायतदारांची विदारक कहाणी आहे. शासनाने फळबागायतदारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी, उत्पादन खर्च आणि बाजारभावाबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. फळांना व शेतमालाला भाव नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्याने जगायचे कसे?
शेतकऱ्याने वर्षानुवर्षे जपलेली झाडे काही मिनिटांत जेसीबीच्या दाताखाली जमीनदोस्त होताना पाहण्याची वेळ आली आहे. शेतीत पैसा, श्रम आणि वेळ ओतूनही हातात काहीच उरत नसेल, तर शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? असा सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहे.
अपेक्षित भाव मिळेना
मोसंबीला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य बाजारभाव मिळत नसल्याने फळबागायतदार अडचणीत आले आहेत. पाण्याची उपलब्धता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील दरांची अनिश्चितता या तिहेरी संकटाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.