जालना : जालना जिल्ह्यात यंदा तुरीचे उत्पादन कमी झाले असले तरी शासकीय तूर खरेदी सुरू न झाल्याने भाव तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. तुरीचे भाव सध्या 6 हजार ते 8 हजार 400 प्रतिक्विटल असून तुरीची दररोज मोठी उलाढाल होतांना दिसत आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज चार ते पाच कोटी रुपयांची तूर खरेदी होत आहे. तुरीच्या पांढऱ्या जातीची सर्वाधिक 5304 क्विंटल आवक होत आहे.पांढऱ्या तुरीचे कमाल दर 8400 रुपये तर सरासरी दर 7 हजार 851 रुपये आहेत.
तुरीच्या लाल जातीला 8 हजार 001 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सोयाबीनची 21 हजार 22 क्विंटल आवक होऊन सरासरी भाव 5 हजार 400 रुपये दर मिळाला. कापसाच्या सीसीआय जातीला 8 हजार 010 रुपयांपर्यंत कमाल दर मिळत सरासरी 7 हजार 986 रुपये दर नोंदला गेला.
मोंढयात मक्याची आवक 1 हजार 25 क्विंटल आवक आहे.भाव सरासरी 1600 रुपये मिळत आहे. हरभऱ्याला 5 हजार 200 रुपये, ज्वारीला 3 हजार 500 रुपये, गव्हाला 2 हजार 450 रुपये तर बाजरीला 2 हजार 900 रुपये सरासरी दर मिळत आहे. गुळाच्या पिवळ्या जातीला 4 हजार 800 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
व्यवहारात तूर, सोयाबीन आणि कापूस या पिकांचा मोठा वाटा आहे. बाजारात दर स्थिर असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगामी दिवसांत शेती मालाची आवक वाढण्याची शक्यता बाजार समिती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
भाववाढ होणार
जालना कृषी उत्पन्न बाजार समीतीत तुरीची आवक तुलनेने कमी होत असली तरी अपेक्षीत भाव नाहीत.शासकीय खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर तुरीच्या भावात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.