AI should be used in work: District Collector Mittal
जालना, पुढारी वृत्तसेवा: तंत्रज्ञानात झपाट्याने नवनवीन बदल होत असून सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार (२८) रोजी एम. के. सी. एल. मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी मित्तल बोलत होत्या.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, तहसीलदार अनिल नव्हाते, तहसीलदार प्रणाली तायडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या कि, शासकीय कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कामे गतीने होण्यास मदत होईल. यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी एआयची माहिती दिली.