जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतरस्त्यांबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲग्रीपथ ’ व्हाटसॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले असून, हा उपक्रम (उत्कृष्ट प्रशासन) आणि नागरिकाभिमुख सेवेचा प्रभावी नमुना ठरणार आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ता नसणे किंवा अडवलेला मार्ग यामुळे शेतकऱ्यांना शेती कामात मोठ्या अडचणी येत होत्या. शेतरस्त्यासाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना अनेक कार्यालयीन फेऱ्या, टायपिंग खर्च आणि वेळखाऊ प्रक्रिया करावी लागत होती.या सर्व अडचणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने डिजिटल उपाय म्हणून ॲग्रीपथ ’ चॅटबॉट विकसित केला.
ॲग्रीपथ ’ चॅटबॉट हा कृत्रीम बुध्दीमत्तेवर आधारित, मराठी भाषेत कार्य करणारा चॅटबोट आहे.शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तर पद्धतीने संवाद साधून आवश्यक माहिती घेतली जाते.दिलेल्या माहितीनुसार शेतरस्त्यासाठीचा अर्ज आपोआप तयार होतो.या चॅटबॉटव्दारे मराठी भाषेत सुलभ संवाद साधता येतो. नवीन शेतरस्ता किंवा अडवलेला मार्ग मोकळा करण्यासाठी स्वतंत्र अर्ज निर्मिती करता येते.शासन नियमांनुसार अचूक, अर्ज तयार करण्यास मदत होते.अर्ज मोबाईलवर डाउनलोड करून प्रिंट काढता येते.
शेतकऱ्यांना होणारे फायदे
या चॅटबॉटमुळे अर्जासाठी कार्यालयात जाण्याची शेतकऱ्यांना गरज नाही, टायपिंग सेंटरचा खर्च वाचतो, कमी वेळेत अर्ज तयार होतो, कमी साक्षरतेतही सहज वापर शक्य, प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह होते, प्रशासनासाठी लाभ सुस्थितीत व नियमबद्ध अर्ज प्राप्त होतात,अर्ज छाननी व कार्यवाही अधिक जलद होते,अधिकारी व कर्मचाऱ्यांचा वेळ वाचतो,सेवा वितरणात कार्यक्षमता वाढते, ‘ॲग्रीपथ ’ चॅटबॉट’ हा ग्रामीण प्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दर्शवतो. ॲग्रीपथ ’ चॅटबॉट साठी मोबाईल नंबर 9172814066 किंवा दिलेला क्यु आर कोड स्कॅन करा.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयाचा ‘ॲग्रीपथ ’ चॅटबॉट हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी सोपा, जलद आणि विश्वासार्ह डिजिटल मार्ग ठरणार असून, ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ओळखला जात आहे.अशिमा मित्तल, जिल्हाधिकारी